दहा रुपयात थाळी तर एक रुपयात आरोग्य चाचणी
मुंबई नगरी टीम
मुंबई : कॅांग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष असलेल्या महाआघाडीचा संयुक्त शपथनामा जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला आहे. मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी हा वचननामा घोषित केला. शिवसेनेच्या वचननाम्यामुळे युतीतील शिवसेना भाजपचे जाहीरनामे हे वेगळे असणार हे स्पष्ट झाले आहे.दहा रुपयात थाळी आणि एक रुपयात आरोग्य चाचणी,अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्षाला १० हजार जमा करणार, वीज दर ३० टक्क्यांनी कमी करण्याच्या आश्वासनांची खैरात या वचननाम्यात करण्यात आली आहे.
राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त आणि सकस जेवण केंद्र स्थापन करून १० रूपयात थाळी देण्याबरोबरच,शिव आरोग्य योजनेअंतर्गत वन रूपी क्लिनिक सुरू करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले आहे. ग्रामिण भागातील जनतेला नजरेसमोर ठेवून ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार असल्याचे आश्वासन या वचननाम्यात देण्यात आले आहे. अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्षाला १० हजार जमा करणार असल्याचे वचन देतानाच आर्थिक दुर्बल घटकातील मुलींचे शिक्षण मोफत करणार अशा अनेक आश्वासनांची खैरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
अत्यंत प्रामाणिकपणे हा वचननामा आम्ही जनतेसमोर सादर करत आहोत. आमच्याकडून कोणताही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही, असे वचन देतो. राज्याच्या तिजोरीचा विचार करून हा वचननामा तयार केला असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आरेविषयी बोलताना ते म्हणाले की, आमचा आरे कारशेडला विरोध कायम आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरेबाबत भूमिका स्पष्ट करावी, यासाठी केवळ शिवसेनेला जबाबदार धरू नका तसेच या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार असून मी आकडे सांगत नाही, माझा आकड्यांवर विश्वास नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दहा रूपयांत जेवण हे स्वच्छ, सकस असेल. यासाठी महिला बचत गटांना हे काम दिले जाईल, असेही ते म्हणाले. शिवसेनेचा वचननामा खूप संशोधनानंतर बनविण्यात आला आहे. वचननामा तयार करण्याच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग सर्वाधिक होता. या वचननाम्यात सर्व गोष्टींचा विचार केला आहे, असे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितले पहिल्या दिवसापासून या वचननाम्यातील वचनांवर काम केले जाईल, असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्वाचे मुद्दे
शिव आरोग्य योजनेअंतर्गत वन रूपी क्लिनिक सुरू करणार
राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त आणि सकस जेवण केंद्र स्थापणार
सरकारी नोकरीतील सर्व रिक्त पदे भरणार
मुख्यमंत्री आवास योजने’अंतर्गत राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे घर देणार
३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते
आर्थिक दुर्बल घटकातील मुलींचे शिक्षण मोफत करणार
राज्यातील १५ लाख पदवीधर युवकांना ‘युवा सरकार फेलो मार्फत शिष्यवृत्ती
रोजगाराभिमूख शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणार.
अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्षाला १० हजार जमा करणार.
तालुका स्तरावर गाव ते शाळा प्रवासासाठी विद्यार्थी एक्स्प्रेसची सुरूवात करणार
प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिक व शारीरिक तपासणी करणार
नगरपरिषदा, नगरपालिके, महानगरपालिकेत रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद
ज्या ठिकाणी बससेवा नाही त्या ठिकाणी मुंबईप्रमाणे बससेवेची सुरूवात करणार
सर्व राज्यांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारणार