शेतक-यांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

शेतक-यांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  परतीच्या पावसाने राज्यभरात शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतक-यांना मदत द्यावी. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत आज टिळक भवन येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनीताई पाटील नेते आदी उपस्थित होते.

या बैठकीत निवडणूक निकालासह परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतक-यांच्या नुकसानीबद्दल चर्चा करण्यात आली. राज्यात अद्यापही पाऊस सुरु असल्याने शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेले खरीप पूर्णपणे वाया गेले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील भात शेती उद्धवस्त झाली आहे. फळबागांसह पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  गेल्या वर्षी दुष्काळात होरपळेला शेतकरी सावरण्यापूर्वीच तो ओल्या दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे सरकारने तात्काळ पंचनामे करावेत व शेतक-यांना भरीव आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे राज्यातील उद्योग धंदे अडचणीत आले आहेत. बेकारी वाढली आहे. त्याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीन देशभरात ५ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.उद्या गुरुवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी  टिळक भवन दादर मुंबई येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

Previous articleशिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर ?
Next articleसत्तेचे समान वाटप झाल्यास महाराष्ट्रात स्थिर सरकार