सत्तेचे समान वाटप झाल्यास महाराष्ट्रात स्थिर सरकार

सत्तेचे समान वाटप झाल्यास महाराष्ट्रात स्थिर सरकार

मुंबई नगरी टीम

मुंबई: राज्यात युतीचेच सरकार स्थापन होणार आहे. फक्त ठरल्याप्रमाणे सत्तेची विभागणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करीत, ठरल्याप्रमाणे सत्तेचे वाटप झाल्यास पुढील ५ वर्षात महाराष्ट्रात स्थिर सरकार असेल, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

भाजपाच्या विधिमंडल नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत बोलत होते.भाजपकडे १४५ आमदारांचे संख्याबळ असेल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांचे स्वागत करू, असे वक्तव्य राऊत केल्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे. निम्या निम्या मंत्रीपदावर अडून राहिलेल्या शिवसेनेची आजची भूमिका नरमल्याचे दिसत होते अशी चर्चा आहे. राज्यात युतीचेच सरकार येणार आहे. फक्त ठरल्याप्रमाणे सत्तेची विभागणी व्हावी, अशी अपेक्षा राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.ज्या पक्षाकडे १४५ आमदारांचे बहुमत आहे त्यांनी मुख्यमंत्री कोण हे ठरवावे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. भाजपकडे जर संख्याबळ असेल तर त्यांनी सत्तास्थापन करावी. त्यावेळी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर आम्ही त्यांचे स्वागत करू. मात्र, कुणीही सत्तास्थापनेचा दावा केला, तरी त्यांना बहुमत सिद्ध करावंच लागेल असा सूचक इशारा त्यांनी दिला.शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले की, या केवळ अफवा आहेत, जर असे कुणी म्हणत असेल तर ते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे इतर प्रमुख नेते संपर्कात असल्याचेच म्हणायचेच बाकी आहे. जर असे असेल तर माझ्याही संपर्कात भाजपचे ६० आमदार आहेत. त्यांचे सकाळपासून फोन आले आहेत आणि ते सत्ता स्थापनेविषयी विचारत आहेत असेही राऊत यांनी सांगितले.

Previous articleशेतक-यांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार
Next articleभाजपाला  अपक्षांसह १३ आमदारांचा पाठिंबा