मित्र पक्षांना चार मंत्रीपदे द्या : रामदास आठवले

मित्र पक्षांना चार मंत्रीपदे द्या : रामदास आठवले

मुंबई नगरी टीम

मुंबई :  विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमताचा जनादेश मिळाला आहे.त्यामुळे  भाजप शिवसेनेने एकत्र येऊन महायुतीचे सरकार स्थापन करावे अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार दोन्ही पक्षांनी करू नये. महायुतीचे लवकर सरकार स्थापन करून चार मित्र पक्षांना प्रत्येकी एक याप्रमाणे चार मंत्रीपदे देण्यात यावीत त्यात रिपाइंला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी करणारा ठराव आज महायुतीच्या मित्रपक्षांच्या बैठकीत सर्वसंमतीने  मंजूर करण्यात आल्याची माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी दिली.

रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्या सुरुची इमारतीतील शासकीय निवासस्थानी महायुतीच्या मित्रपक्षांची  बैठक आज केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. त्या बैठकीला रासपचे नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे प्रमुख आ. विनायक मेटे; रयत क्रांती संघटना प्रमुख सदाभाऊ खोत; तसेच रिपाइंचे  राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आदी उपस्थित होते. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने जनादेशाचा आदर करून भाजप शिवसेने एकत्र येऊन मित्रपक्षांना विश्वासात घेऊन महायुतीचे  सरकार स्थापन करावे; तसेच भाजप च्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची  निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत करण्यात आला. महायुतीचे सरकार स्थापन करताना मित्रपक्षांना प्रत्येकी एक अशी चार मंत्रीपदे देण्यात यावीत. त्यात रिपाइंला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी करणारा ठराव आजच्या  बैठकीत करण्यात आला.

महाराष्ट्रात  एकूण ४३ मंत्रीपदांचे मंत्रिमंडळ साकारता येते त्यात  मित्र पक्षांना चार मंत्रीपदे आणि शिवसेनेला किमान १५ मंत्रीपदे दिली तरी आमची काही हरकत नाही.असे सांगत शिवसेना भाजपने एकत्र  येऊन सरकार स्थापन करावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी शिवसेना भाजप दोन्ही पक्षांना केली आहे. १९९५ मध्ये शिवसेनेचे जास्त आमदार असल्याने त्यांचाकडे ५ वर्षे मुख्यमंत्रीपद होते.त्याप्रमाणे आता भाजपचे जवळपास दुप्पट आमदार असल्याने देवेंद्र फडणवीस हे ५ वर्षे मुख्यमंत्री राहतील  त्यासाठी भाजप शिवसेने एकत्र सरकार स्थापन करावे असे मत   आठवले यांनी व्यक्त केले.

Previous articleएकनाथ शिंदेंच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ ?
Next articleहेरगिरी थांबवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे राज्यपालांना साकडे