भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसची शिवसेनेला साथ ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना भाजपातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच महाराष्ट्रातील काँग्रेस प्रमुख नेते काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या भेटीसाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर काय निर्णय घेतला जातो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला साथ देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपातील वाद टोकाला गेला असतानाच या वादात आता काँग्रेस उडी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला साथ देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला साथ देवून भाजपावर राजकीय कुरघोडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. राज्यातील निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे हे काँग्रेस नेते सोनिया गांधीच्या निवासस्थानी पोहोचले आहे. या भेटीत राज्यातील काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाबाबतही चर्चा होईल.