मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष त्वरीत सुरू करा : आ. उदय सामंत

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष त्वरीत सुरू करा : आ. उदय सामंत

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आल्याने राज्यातील गरजू रूग्ण मदती अभावी हवालदिल झाले असतानाच शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट घेवून हा कक्ष तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.

राज्यात सत्ता पेच कायम राहिल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव पाठवल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.राष्ट्रपती राजवट लागू होताच सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्री,मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पदाचा कार्यभार संपुष्टात आल्याने त्यांची दालने व कार्यालयातील कागदपत्रे, नोंदवह्या फर्निचर आदींची आवराआवर करण्याच्या व कार्यालयाचा ताबा सुपूर्द करण्याचा आदेश जारी केल्यानंतर मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला.राज्याच्या विविध भागातून मंत्रालयात येणा-या गरीब रुग्णांना दिलासा देण्याचे काम या मार्फत करण्यात येते.मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद असल्याने मोठ्या अपेक्षेने मंत्रालयात येणा-या गरीब रूग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांना मोकळ्या हाताने परत जावे लागत असल्याने मोठी नाराजी पसरली आहे.त्यासंदर्भात आज शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट घेवून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष त्वरीत सुर करण्याची मागणी केली आहे.गरजू व आर्थिक दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीअभावी अनेक अर्ज प्रलंबित असून, गरजू रूग्णांची गैरसोय होत असल्याबाबतचे निवेदन दिले. यावर लवकरच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येईल असे आश्वासन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आ. सामंत यांना दिले.

Previous articleभाजपाशिवाय कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही : चंद्रकांत पाटील
Next articleशेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी २५ हजार आर्थिक मदत द्या