अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी  आर्थिक मदतीची घोषणा

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी  आर्थिक मदतीची घोषणा

मुंबई नगरी टीम

मुंबई :  गेल्या दोन महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज आर्थिक मदतीची घोषणा केली.खरीप  पिकांसाठी प्रती हेक्टर ८ हजार रुपये तर फळबागायती , बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.यामुळे राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात राज्यातील विविध भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत करण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांकडे केली होती.आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली असून,खरीप  पिकांसाठी प्रती हेक्टर ८ हजार रुपये तर फळबागायती, बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपाल  कोश्यारी यांनी आज जाहीर केला. या मदतीचे वितरण तातडीने करण्यात यावे अशा सूचनाही राज्यपाल  कोश्यारी यांनी राज्य प्रशासनाला दिल्या आहेत.

Previous articleशेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी २५ हजार आर्थिक मदत द्या
Next articleमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू