भाजपा बहुमत सिद्ध करु शकणार नाही

भाजपा बहुमत सिद्ध करु शकणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांचे सह्याचे पत्र सोपवले असून,सध्या अस्तित्वात असलेले भाजपाचे सरकार बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यास महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आज राजभवनावर जावून १६२ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राजभवन कार्यालयातील अधिका-यांकडे सादर केले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवी दिल्लीच्या दौ-यावर असल्याने हे पत्र अधिका-यांकडे द्यावे लागले.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी  आज सकाळी राजभवनावर जावून हे पत्र सादर केले.राज्यात नव्याने अस्तित्वात आलेले भाजपाचे सरकार बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यास महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी असे शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यपाल सांगतील तेव्हा आम्ही १६२ आमदारांची राज्यपालांसमोर परेड करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.संख्याबळ नाही असे सांगत भाजपाने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाकडे आजही पुरेसे संख्याबळ नसल्याने ते आजही बहुमत सिद्ध करु शकणार नाहीत. त्यामुळे भाजपा  बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर  महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात येवून पदभार स्वीकारला.त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्या जवळील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.त्यानंतर सहाव्या मजल्यावरील दालनात त्यांनी पदभार स्वीकारला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत निधीच्या धनादेशावर केली व एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील  कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना त्यांच्या कर्करोगावरील उपचारासाठी सुपूर्द केला.

दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनही त्यांनी आज पदभार न स्वीकारल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारला तर अजित पवार हे पदभार न स्वीकारताच माघारी फिरले.आज अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले मात्र त्यामध्ये यश आले नाही.विधानभवनात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ,जयंत पाटील, सुनिल तटकरे यांनी प्रयत्न केले.

Previous articleदादा… कुटुंबात फाटाफूट नको उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे; सुप्रिया सुळेंचे भावनिक आवाहन
Next articleहा गोवा नाही महाराष्ट्र आहे : शरद पवारांनी ठणकावले