मेगाभरतीवरून चंद्रकांत पाटलांचे घूमजाव

मेगाभरतीवरून चंद्रकांत पाटलांचे घुमजाव

मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बडे नेते गळाला लावून भाजपाने आपले संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे भाजपाच्या मूळ संस्कृतीला धक्का लागला असल्याचे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे नुकसान झाल्याचे अप्रत्यक्ष सूतोवाच आकुर्डीतील एका कार्यक्रमात केले होते.या कार्यक्रमातील आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगून त्यांनी आपल्या विधानावरून घूमजाव केले आहे.आपण केलेल्या भाषणाचा व्हिडिओ उपलब्ध असून अशा बातम्या देण्यापूर्वी पत्रकारांनी शहानिशा करायला हवी,असेही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. या मेगाभरतीत राधाकृष्ण विखे-पाटील,सुजय पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील,गणेश नाईक,संदीप नाईक,हर्षवर्धन पाटील,मधुकर पिचड, वैभव पिचड,राणा जगजितसिंह पाटील यांचा यामध्ये समावेश आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेत नेत्यांना भाजपात प्रवेश दिल्याने भाजपच्या मूळ संस्कृतील धक्का लागल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी काल आकुर्डीत झालेल्या एका कार्यक्रमात केले होते.आज मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे सांगितले.भाजपाच्या आकुर्डी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आपण केलेल्या भाषणाचा व्हिडिओ उपलब्ध असून अशा बातम्या देण्यापूर्वी पत्रकारांनी शहानिशा करायला हवी, असेही पाटील यांनी सांगितले.

भाजपाच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आपण आकुर्डी येथे उपस्थित होतो.जिल्हाध्यक्षांची निवड झाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांना संबोधित केले.त्यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले की, विविध पक्षातील नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना त्या त्या पक्षांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षाची कार्यपद्धती समजून सांगावी. पण आपल्या या विधानाचा माध्यमांकडून विपर्यास करण्यात आला.प्रसिद्धी माध्यमांतील व्यक्तींनी त्यांच्या मनातील विचार आपल्यावर थोपवू नयेत. म्हणाले की,लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या वेळी अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्या नेत्यांचा पक्षाला उपयोगच झाला आहे. पक्षाच्या बळकटीमध्ये त्यांचे योगदान झाले आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय कोअर कमिटीने विचारपूर्वक आणि एकमताने घेतला होता. त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अभिमानच आहे असेही पाटील म्हणाले.अन्य राजकीय पक्ष हे एखादा नेता किंवा घराण्याचे असतात.पण भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.भाजपाची कार्यपद्धती इतर पक्षांपेक्षा वेगळी आहे.येथे विचारविनिमय करून निर्णय घेतले जातात.पक्षाची ही कार्यपद्धती जुन्या कार्यकर्त्यांनी नव्यांना सांगावी अशी माझी सूचना आहे. मला आनंद आहे की, भाजपामध्ये नव्याने आलेल्या नेत्यांनी पक्षाची कार्यपद्धती अंगिकारली आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous articleपुणे जिल्हयातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार
Next articleअंगणवाडी सेविका,मदतनिसांची ५ हजार ५०० पदे तत्काळ भरणार