मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर ; आता ३० डिसेंबरचा मुहूर्त

मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर; आता ३० डिसेंबरचा मुहूर्त

मुंबई नगरी टीम

मुंबई : हिवाळी अधिवेशन संपताच पुढील दोन दिवसांमध्ये ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार आज मंगळवारी तिन्ही पक्षांतील काही आमदारांचा शपथविधी केला जाणार अशी चर्चा होती.शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार असली तरी काँग्रेसमध्ये याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला असल्याचे स्पष्ट झाले आहे.आता या विस्ताराला ३० डिसेंबरचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर करण्यात येणार असल्याची चर्चा होती.त्यानुसार आज मंगळवारी हा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत होते. या विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १०-१० कॅबिनेट तर दोन्ही पक्षाचे प्रत्येकी ३ राज्यमंत्री आणि काँग्रेसच्या १० मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार असल्याची दिवसभर चर्चा होती.मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल सह्याद्री अतिथीगृहात भेट घेवून सुमारे तासभर चर्चा केली.संभाव्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणाकोणाला संधी देणार त्या आमदारांच्या नावाची यादी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अंतिम केली असली तरी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याला संभाव्य यादीला हिरवा कंदिल दिला नसल्याने अखेर आज होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. आता हा विस्तार येत्या ३० डिसेंबरला होणार असल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. तर विस्तारात तरूण आमदारांना संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या तरूण आमदारांकडून केली जात आहे.दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्येष्ठ नेते दिल्ली मुक्कामी आहेत. राज्यातील नेते आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात विस्तारासंदर्भात आज बैठक होणार अशी चर्चा आहे.या बैठकीत कोणाला संधी द्यावयाची यावर एकमत झाल्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. येत्या सोमवारी नाताळ असल्याने ३० डिसेंबरला ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे सांगण्यात येत आहे.शिवसेना राष्ट्रवादीची मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण झाली असली तरी काँग्रेसच्या यादीमुळे विस्ताराला विलंब होत आहे.मंत्रीमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादीला तयारी करावी लागत नाही.आम्हाला परवानगी घ्यायला कुठे जावे लागत नाही असा टोला आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता काँग्रेसला लगावला आहे.

Previous articleनागरिकत्व सुधारणा कायद्याची भिती बाळगू नका-मुख्यमंत्री
Next articleमराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी