शिवसेनेतील नाराज आमदारांची संख्या वाढली

शिवसेनेतील नाराज आमदारांची संख्या वाढली

मुंबई नगरी टीम

मुंबई : सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेमध्येही नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे. विस्तारात डावलल्याने शिवसेनेतील दिवाकर रावते,दीपक केसरकर,प्रताप सरनाईक,तानाजी सावंत,रवींद्र वायकर,सुनील प्रभू,भास्कर जाधव,रामदास कदम हे नेते नाराज असल्याची चर्चा आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षातील नाराज नेत्यांची कशी समजूत काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोमवारी झालेल्या मंत्रिमडळ विस्तारानंतर काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील नेत्यांची नाराजी समोर आली आहे.आता या नाराजांची कशी समजूत काढायची यासाठी पक्षांच्या प्रमुखांना कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.राष्ट्रवादीचे माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचे आज बंड थंड झाले असतानाच,विस्तारात डावलल्याने भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी थेट पुण्यातील पक्ष कार्यालय फोडले.या दोन्ही पक्षांनंतर शिवसेनेतील असणारी नाराजी पुढे येत आहे.मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे.मंत्रीपदाचा अनुभव असतानाही विश्वासात न घेता विस्तारात डावलल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.शिवसेनेचे नेते माजी मंत्री दिवाकर रावते,खा. संजय राऊत यांचे बंधु सुनिल राऊत,माजी राज्यमंत्री दीपक केसरकर,माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर,माजी मंत्री तानाजी सावंत,प्रताप सरनाईक,सुनील प्रभू, भास्कर जाधव,प्रकाश आबिटकर या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने नाराज असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेमध्ये तीन ते चार वेळा निवडुन आलेले आमदार असताना सोमवारी झालेल्या विस्तारात अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांना कॅबिनेट,प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि अपक्ष राजेंद्र येड्रावकर यांना राज्यमंत्रीपदी शिवसेनेकडून संधी दिल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. एकीकडे मुंबईतून सुनील राऊत यांना संधी न मिळाल्याने ते नाराज आहेत.कोल्हापूरातून प्रकाश आबिटकर, मराठवाड्यातून परभणीचे राहूल पाटील, उस्मानाबादमधून भूम परंडाचे आमदार तानाजी सावंत,कोकणातील गुहागरचे भास्कर जाधव, विदर्भातील रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांना संधी देण्यात आलेली नाही.या आमदारांना विस्तारा संधी मिळण्याची अपेक्षा होती मात्र डावलले गेल्याने हे आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करत नसले तरी त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.आता या नाराजांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleराष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचे “बंड झाले थंड”
Next articleमंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर दुसऱ्या दिवशीही हार -फुलांची रीघ!