पनवेलमधील महिलेला जाळल्याच्या प्रकरणातील आरोपींविरुध्द कठोर कारवाई

मुंबई नगरी टीम
नवी मुंबई : पनवेल मधील दुंदरे गावात महिलेला जाळल्याची घटना अतिशय गंभीर आहे. या घटनेला आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, परंतु यांसदर्भात हत्या झाल्याचा गुन्हा नोंदवून या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली,त्यानंतर पोलिंसांनी या प्रकरणात महिलेची हत्या झाल्याचा गुन्हा नोंदवून या प्रकरणातील आरोपींविरुध्द कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

पनवेलच्या घटनेमधील आरोपींना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेतली. त्यांच्या समवेत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रमेश पाटील आदि उपस्थित होते. सदर प्रकरण आत्महत्या भासविण्याचा प्रकार सुरु आहे, पण संबंधित दुदैर्वी महिलेची हत्या झाली आहे. परंतु पोलिस यंत्रणा हे प्रकरण आत्महत्या दाखवून बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु या महिलेची हत्या झाली असून या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी पोलिस आयुक्तांना केली,त्यानंतर पोलिस आयुक्तांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या मागणीची दखल घेऊन व सदर प्रकरणातील तपासाची वस्तुस्थिती लक्षात घेऊन या महिलेची आत्महत्या नव्हे तर हत्या झाल्याचा गुन्हा नोंदवून घेतल्याची माहिती दरेकर यांनी दिली.
गेले काही दिवसांत विनयभंग,जाळपोळ, हत्या सारख्या गंभीर घटना घडत असून त्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली आली आहे. गुन्हेगारांना पोलिंसाचा धाक उरला नाही, त्यामुळे राज्य सरकराने व पोलिसांनी राज्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी धडक कृती आराख़डा तयार करण्याची मागणी असल्याचे दरेकर यांनी केली.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. राज्यातील महिला आज सुरक्षित नाही, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे या गंभीर प्रश्नावर विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.

Previous articleआता तरी सरकार जागं होणार का ? : प्रविण दरेकर
Next articleठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय ; १०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार