मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी समितीची पहिली बैठक मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी विधानभवन येथे आयोजित केली आहे.
गेल्या आठवड्यात मंत्रीमंडळाने ही उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या समितीसंदर्भात आजच शासननिर्णय जारी झाला असून, समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तातडीने समितीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी ३ वाजता विधानभवनमध्ये ही बैठक होणार असून, याप्रसंगी समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील व विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी विधानभवन येथे अशोक चव्हाण यांची भेट घेतली व आपल्या मागण्यांसंदर्भात बाजू मांडली.