मुंबई नगरी टीम
मुंबई : ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील ज्या रहिवाशांनी पुनर्विकासाच्या कामासाठी घरे मोकळी करून दिली अशा २६० रहिवाशांना म्हाडामार्फत १५ मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये नवीन घरे दिली जावीत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
ना.म.जोशी मार्गाच्या बीडीडी चाळीतील ८०० पैकी २६० रहिवाशी पहिल्या टप्प्यात संक्रमण शिबीरामध्ये स्थलांतरीत झाले. उर्वरित रहिवाशांनी अजून घरे रिकामी केली नाहीत. ज्या २६० रहिवाशांनी घरे रिकामी करून संक्रमण शिबीरात स्थालांतरीत झाले होते. त्यांच्यासाठी सोडत काढून त्यांना करारासह नवीन घरे द्यावीत, असे केल्याने उर्वरित रहिवाशांमध्ये विश्वास निर्माण होऊन ते घरे रिकामी करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून हाताळला जावा व कामाला गती द्यावी अशा सूचना देऊन ते पुढे म्हणाले , तिथे राहत असलेल्या रहिवाशांमध्ये जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनाही संक्रमण शिबीरात स्थलांतरीत करावे. या कामासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या नियुक्तीसह समर्पित भावनेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची टीम तयार करावी.
ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाप्रमाणेच नायगाव, शिवडी आणि वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला वेग द्यावा, टप्प्यांची निश्चिती करून येथे ही काम सुरु केले जावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.