मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११ झाली असून,या सर्व रुग्णांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे.राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी.पुढील किमान १५ ते २० दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत विविध संस्थांना विनंती करा,अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी यावेळी उपस्थित होते.
यात्रा,सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा. लोकांना प्रशिक्षित करा. कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्यावा. शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकींग न करण्याच्या सूचना द्या. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक जागा येथे स्वच्छता ठेवा. जे या सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करा.बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती याबाबत विचारपूस करण्यासाठी पथके तयार करा. प्रत्येक गावासाठी एसओपी तयार करा. पुढील किमान १५ ते २० दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत विविध संस्थांना विनंती करा, अशा सूचना मुख्य सचिवांनी यावेळी केल्या.
प्रशासनाला निर्देश देताना मुख्य सचिव म्हणाले, चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून १५ फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे आणि ते देशात परतले आहे त्यांना सक्तीने १५ दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना द्याव्यात. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या सात देशातून आलेल्या व येणाऱ्या प्रवाशांचे १०० टक्के क्वॉरंटाईन करण्यात यावे. पुणे, मुंबई, नागपूर येथे कशाप्रकारची क्वॉरंटाईन सुविधा केली आहे याची माहिती महापालिका आयुक्तांनी तातडीने द्यावी. अन्य शहराच्या महापालिका आयुक्तांनी देखील अशाप्रकारची माहिती उद्यापर्यंत देण्याबाबत मुख्य सचिवांनी सांगितले.