कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील १८ गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद

मुंबई नगरी टीम
मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी १८ गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात येणार आहे, असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत केले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांची सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती, सर्वपक्षीय युवा मोर्चा तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी शासनाकडे याबाबत वेळोवेळी मागणी केलेली आहे. त्यास अनुसरून कल्याण-डोंबिवली शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातून २७ गावे वगळून या गावांच्या क्षेत्राकरिता नगरपरिषद स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्यशासनाने प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसुचनेच्या अनुषंगाने प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना कळविण्यात आले. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी प्राप्त सूचना व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा अहवाल शासनास सादर केलेला आहे.

हा अहवाल विचारात घेता, कल्याण-डोंबिवली महानगरपलिकेतील २७ गावांपैकी बहुतांश शीळ-कल्याण रस्त्याचे पश्चिमेस असणाऱ्या ९ गावांचे (आजदे, सागाव, नांदविली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा) मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले असल्यामुळे ही गावे महानगरपालिकेमध्ये कायम ठेवण्यात येणार आहेत. तर उर्वरित १८ गावे (घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे) महानगरपालिका मधून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Previous articleमंत्री अस्लम शेख यांनी वाटले विधानभवनात हँड सँनिटायझर
Next articleराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या २६ वर