मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची चौकशी करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजीनिअर तरुणाने गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. या गंभीर प्रकरणी प्रविण दरेकर यांनी ठाणे शहरचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे संर्पक साधून संबंधितांविरुध्द तातडीने व निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.त्यानंतर सुरक्षारक्षकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाची दखल घेत विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी पोलिस आयुक्त फणसाळकर यांच्याशी संपर्क साधून गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्याविरुध्द कठोर कारवाईची मागणी केली. याप्रकरणातील आरोपी कितीही मोठा असला तरी त्याच्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी दरेकर यांनी केली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरु असुन यामध्ये कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त फणसाळकर यांनी दरेकर यांना दिले आहे.

Previous articleविद्यार्थ्यांनो…आता घरी बसूनच अभ्यासक्रम पूर्ण करा !
Next articleकेशरी रेशनकार्ड असणा-यांना गहू ८ तर तांदूळ १२ रुपये किलोने मिळणार