पालघर  हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्या : प्रविण दरेकर

मुंबई नगरी टीम

मुंबई : पालघर येथील गडचिनचले गावात दोन साधु व त्यांचा एक वाहन चालक यांची पोलिसांसमक्ष जमावाने निर्घुण हत्या केली आहे, ही बाब खूप धक्कादायक व चिंतेची आहे. विशेषता पोलिसांसमोर घडलेली ही निर्घुण हत्या बऱ्याच शंका उपस्थित करतात. त्यामुळे या गंभीर घटनेचा तपास निपक्षपातीपणे होण्याच्या दृष्टीने या प्रकरणाचा तपाल सी.बी.आयकडे वर्ग करावा व दोषींविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज यांसंदर्भात पालघरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले आहे. सदर पत्रानुसार या गंभीर घटनेच्या वेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन करून शांतता राखण्याचे काम करायला हवे होते, तथापि याबाबत पोलिसांनी हेतुपूर्वक केलेली निष्क्रियता दिसून येते. साधूंची हत्या होत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेणे याचा अर्थ पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली करत असल्याची शक्यता आहे असेही या पत्रात नमूद केले आहे.

या प्रकणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र पालघर जिल्हाधिका-यांना देण्यासाठी विरोधी पक्ष नेते दरेकर पालघरच्या दिशेने निघाले होते. मात्र कोरोनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी असल्यामुळे त्यांना पोलिसांनी पालघरमध्ये जाण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे सदर पत्र पालघरचे माजी आमदार पास्कर धानोरे व पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यामार्फत पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

Previous articleराज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत तब्बल ४० हजार वाहने जप्त
Next articleराज्यात आज ४६६ कोरोना बाधीत; रुग्णांची संख्या ४६६६ वर पोहचली