कोण होणार विधानपरिषदेचे उपसभापती ;९ सदस्यांची मुदत संपणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह विधानपरिषदेच्या ९ सदस्यांची मुदत उद्या २४ एप्रिल  रोजी संपत असुन,रिक्त  होणाऱ्या उपसभापती पदासाठी शिवसेनेत खलबतं सुरु असल्याचे समजते.येत्या पावसाळी अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाणार आहे.विद्यमान उपसभापती गोऱ्हे यांना पुन्हा विधानपरिषदेवर संधी दिली जाते की,शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याला या पदावर विराजमान केले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून दिलेले एकूण नऊ सदस्यांची मुदत उद्या २४ एप्रिल रोजी संपत आहे.या रिक्त होणा-या ९ जागांसाठी मार्चमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते.मात्र राज्यात कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेवून केंद्रीय निवडणूक आयोगाने अनिश्चित कालावधी करिता निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.यामुळे डॉ. गोऱ्हे यांचा पुन्हा  उपसभापती होण्याचा मार्ग तूर्तास लांबणीवर पडला आहे.भाजपच्या स्मिता वाघ,अरुण अडसड, पृथ्वीराज देशमुख,काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड,राष्ट्रवादीचे हेमंत टकले,आनंद ठाकूर, किरण पावसकर आणि शिवसेनेच्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुदत उद्या संपत आहे.निवडणूक आयोगाने या निवडणूका पुढे ढकलल्यामुळे विधानपरिषदेत जाण्यास उत्सुक असलेल्या नेत्यांचा हिरमोड झाला आहे.

 विधान परिषदेत शिवसेनेचे  १३ सदस्य असून,दिवाकर रावते आणि रामदास कदम हे ज्येष्ठ सदस्य आहेत.रावते यांच्या सदस्यत्वाचा कालावधी येत्या ७ जुलै २०२२ तर रामदास कदम हे जानेवारी २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत.या दोघ नेत्या शिवाय बाकी सदस्यांना विधिमंडळ कामकाजाचा दीर्घ अनुभव नाही.त्यामुळे गोऱ्हे यांची सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने रिक्त होणाऱ्या उपसभापती पदावर कोणाला संधी द्यायची यावर शिवसेनेत खलबतं सुरू आहे. राज्यावर असलेले कोरोनाचे संकट संपताच रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांना विधानपरिषदेवर पुन्हा संधी देवून उपसभापतीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जावू शकते. विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाईल.

Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणांना समाज माध्यमातून तुफान प्रतिसाद
Next articleराज्यात आज ७७८ नवीन कोरोनाचे रुग्ण ; रुग्णांची संख्या ६४२७ वर पोहचली