मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा चेंडू दिल्ली दरबारी

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या दोन पैकी एका जागेवर नियुक्ती करण्याची मंत्रिमंडळाने दुस-यांदा शिफारस करूनही त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नसतानाच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसासाठी निवडणुका जाहीर कराव्यात अशी विनंती केंद्रीय निवडणुक आयोगाला आज केली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदारकीचा चेंडू दिल्ली दरबारी टोलविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

२४ एप्रिल रोजी राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त झाल्या आहेत.मात्र देशात आणि राज्यात असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे या निवडणुका केंद्रीय निवडणुक आयोगाने यापूर्वीच लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना येत्या २७ मेपर्यंत दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांची विधान परिषदेच्या एका जागेवर नियुक्ती करावी अशी दुस-यांदा शिफारस राज्यपालांना करण्यात आली.परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती.याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली होती.या घडामोडी सुरू असतानाच राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या ९ जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती आज भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे.

राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला २४ एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदातील ९ जागा भरण्याची विनंती केली आहे.राज्यपालांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशात लॉकडाउनच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक शिथिल उपायांची घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या जागांवर निवडणुका काही विशिष्ट मार्गदर्शक सूचनांसह होऊ शकतात, असे ते म्हणाले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना २७ मे  पूर्वी परिषदेवर निवड होणे आवश्यक आहे असेही राज्यपालांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleविद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षा होणार; लवकरच वेळापत्रक जाहीर करणार
Next article५८३ नवीन कोरोनाबाधीत रुग्ण ; रुग्णांची संख्या १० हजार ४९८ वर पोहचली