आता दारू घेण्यासाठी टोकन पद्धत; ४०० ग्राहकांनाच मिळणार दारू  

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात कालपासून मद्यांची दुकाने सुरू करण्यात आली आहेत.मात्र ग्राहकांनी पहिल्या दिवसापासून सामाजिक अंतराच्या नियमांना हरताळ फासून दारू विक्रीच्या दुकानांसमोर तोबा गर्दी केल्याने ही गर्दी टाळण्यासाठी आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने मार्ग काढला आहे.यापुढे दारू घेण्यासाठी टोकन पध्दत अवलंबली जाणार आहे. प्रशासनाने दिलेल्या वेळेनुसार केवळ ४०० ग्राहकांनाच दारूची विक्री केली जाईल, उर्वरित ग्राहकांना दुसऱ्या दिवशी दारू खरेदीसाठी यावे लागणार आहे.

राज्यात कालपासून दारू विक्रीची दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.परंतु पहिल्या दिवसांपासूनच मद्यप्रेमींनी दारूच्या दुकानांसमोर तोबा गर्दी केल्याचे चित्र राज्यभर आहे.तसेच दारू खरेदी करताना सामाजिक अंतराचे कुठेही पालन होताना दिसत नाही.त्यामुळे होणा-या  गर्दीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तोडगा काढला आहे. आता उद्यापासून दारू खरेदी करण्यासाठी टोकन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.यापुढे दारू विक्री दुकानासमोर ग्राहकांना रांगेत उभे राहण्यासाठी मार्किंग करण्यात येणार असून,त्यामध्ये किमान ६ फुटाचे अंतर ठेवणे आवश्यक असणार आहे.दारू विक्री सुरू करण्यापूर्वी ग्राहकांना मार्किंगमध्ये उभे राहण्याच्या सूचना दुकानदारांकडून करण्यात येणार आहे.रांगेत उभे असलेल्या ग्राहकांना त्यांची ऑर्डर देण्यासाठी एक फॉर्म देण्यात येणार आहे.या फॉर्म मध्ये ग्राहकांना त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचे नाव,कोणत्या कंपनीची दारू खरेदी करायची आहे, त्याचा तपशील लिहावा लागणार आहे. हा फॉर्म दिल्यानंतर ग्राहकांना टोकन क्रमांक देण्यात येईल.टोकन नसल्यास कोऱ्या कागदावर संबंधित दुकानाचा शिक्का आणि मोबाईल नंबर देऊन टोकन क्रमांक दिला जाणार आहे.

सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करण्यासाठी एका तासात ५० ग्राहकांना सेवा देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या तासात ५१ ते १०० क्रमांकांचे टोकन असणा-या ग्राहकांना सेवा देण्यात येईल.अशा प्रकारे विक्रीस परवानगी देण्यात आलेल्या वेळेत केवळ ४०० ग्राहकांनाच दारूची विक्री करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांना सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी लागणार आहे. प्रत्येक विभागात असणारे जवान,सहायक दुय्यम निरीक्षकांची सामाजिक अंतराचे पालन आणि गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहे.गर्दी होणाऱ्या  भागातील पाहणीसाठी भरारी पथक नेमण्यात येवून,उप विभागीय आयुक्त आणि अधीक्षकांनी दारू विक्रीच्या दुकानांसमोरील परिस्थितीची पाहणी करून उपाययोजना कराण्याचे  आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिले आहेत.

Previous articleविद्यापीठ,महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर होणार 
Next article“पण चीन मधून कसा आला इथे कोरोना”…रामदास आठवलेंची कोरोनावर नवीन कविता