राज्यात ८८ पोलीस अधिकारी व ७७४ पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात ८८ पोलीस अधिकारी व ७७४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून,त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.तर १० पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये मुंबईतील ७ जणांचा समावेश आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावणा-या राज्यातील  ८८ पोलीस अधिकारी व ७७४ पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ७, पुणे १, व सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा १० पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला आहे.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोना संदर्भातील १ लाख ८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २३१ घटना घडल्या. त्यात ८१३व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख ८ हजार ४७९ गुन्हे नोंद झाले असून २०,६२६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ३६ लाख ७४ हजार ८९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६७३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ३ लाख ४५ हजार ६०८ व्यक्ती क्वारंटाईन आहेत.अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३ लाख ६८ हजार ९७१ पास देण्यात आले आहेत.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३०५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५८ हजार ५६८ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. राज्यात एकूण ३८८४  रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास ३ लाख ७१ हजार ३१०  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत.

Previous articleमहाराष्ट्रातून आजपर्यंत “एवढे” परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात परत गेले !
Next articleपोलिंसावर हल्ले करणा-यांविरुध्द राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा