मुंबई नगरी टीम
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे आणि सर्वसमान्याचे नेतृत्व म्हणून परिचित असणारे भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर हे आमदारकीची शपथ घेण्यासाठी चक्क आपल्या पारंपारिक धनगरी पेहरावात विधानभवनात आल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित ९ आमदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. राज्यात कोरोनाचे संकट असताना याची संपूर्ण खबरदारी घेत मुख्यमंत्र्यांसह हे ९ आमदार विधानभवनात अपस्थित होते.यावेळी सर्व आमदारांनी तोंडावर मास्क तर हातात ग्लोज घातल्याचे चित्र होते.पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी. घेतली.शपथविधीसाठी आमदार पडळकर चक्क धनगरी पेहरावात विधानभवनात दाखल झाले होते.त्यांनी खादीचे कपडे परिधान केले असले तरी,डोक्यावर फेटा,खांद्यावर घोंगडं तर हातात काठी आणि तोंडाला मास्क असा पेहराव परिधान केला होता.क्षणभर पडळकर यांना कोणी ओळखलेच नाही.त्यानंतर त्यांनी थेट विधानभवन गाठले.सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या सर्व आमदारांना शपथ दिली.मात्र आजच्या दिवसाचे हिरो ठरले ते म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर.
त्यांच्या या धनगरी पेहरावावरून अनेक चर्चा होत्या.मात्र आगामी काळात ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक लढा देतील असे त्यांच्या कार्यकर्ते सांगत होते. पडळकर यांनी बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.पडळकर यांना मोठ्या प्रमाणात धनगर समाजाची मते मिळतील अशी आशा भाजपला होती मात्र अजित पवार बारामतीमधून विक्रमी मतांनी विजयी झाले.हा सर्व इतिहास पाहून भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. भाजपची सत्ता असताना धनगर समाजाला न्याय देता आला नाही मात्र त्यांनी पडळकर यांच्या माध्यमातून धनगर समाजाचे नेतृत्व विधान परिषदेत पाठवले आहे. भविष्यात पडळकर हे समाजाला न्याय देण्यासाठी जोमाने काम करतील असे त्यांच्या एका कार्यकर्त्याने सांगितले.
आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम दिवाकर गोऱ्हे, शशिकांत जयवंतराव शिंदे, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड, प्रविण प्रभाकरराव दटके, गोपिचंद कुंडलिक पडळकर, अमोल रामकृष्ण मिटकरी, राजेश धोंडीराम राठोड यांचा समावेश होता.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह मंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, कृषी मंत्री दादाजी भुसे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे यांच्यासह पडळकर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.