हे सरकार आघाडीचे आहे की,वाधवान सरकार आहे

मुंबई नगरी टीम

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वाधवानला प्रवासासाठी पास देण्याच्या घटनेत अमिताभ गुप्ता यांची चौकशी करून त्यांना त्याच पदावर पुन्हा रूजू करून घेण्याच्या प्रकारामुळे त्यांचा बोलविता धनी कोणी दुसरा होता, हे स्पष्ट झाले आहे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे.

वाधवानला प्रवासासाठी पास देण्याच्या घटनेत अमिताभ गुप्ता यांची चौकशी करून त्यांना त्याच पदावर पुन्हा रूजू करून घेण्याच्या प्रकारामुळे त्यांचा बोलविता धनी कोणी दुसरा होता,हे स्पष्ट झाले आहे. त्याहीवेळी मी हेच सांगितले होते.सरकार चालविणारी व्यक्ती वा सरकारमधील कुणी प्रमुख व्यक्ती सांगत नाही, तोवर कोणताही अधिकारी असे करणार नाही. ज्या गतीने क्लिनचिट देण्यात आली आहे, ती पाहता सरकारच्या इशार्‍यावरच वाधवानला पास देण्यास आला होता, हे स्पष्ट होते आहे. त्यामुळे हे सरकार आघाडीचे आहे की, वाधवान सरकार आहे, हा प्रश्न निर्माण होतो,असे सांगतानाच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली आहे.

मुंबईतील कोणत्या रूग्णालयांत किती खाटा शिल्लक आहेत,याची माहिती नसल्याने रूग्णांची प्रचंड हेळसांड होत असून, याची माहिती देणारा एक डॅशबोर्ड तयार करावा आणि तो जनतेसाठी पाहण्यासाठी खुला असावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.आम्हाला कोणत्याही रूग्णालयात दाखल करून घेतले जात नाही आणि केवळ भटकावे लागते, अशा तक्रारी अनेक रूग्णांकडून येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने एक डॅशबोर्ड तयार करून याची माहिती ऑनलाईन प्रत्येकाला पाहण्यासाठी उपलब्ध असावी. असे झाल्यास कोणत्या रूग्णालयात जायचे, याची माहिती रूग्णाला आधीच कळेल आणि ते त्याच रूग्णालयात जाऊ शकतील. त्यामुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही असेही त्यांनी सांगितले.

Previous article“काठी नं घोंगडं” घेवून गोपीचंद पडळकर आमदारकीच्या शपथविधीला
Next articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्यांसह भाजप आमदार कोकण दौ-यावर