मातोश्रीवरील बैठकीत काय चर्चा झाली; शरद पवारांनी केला खुलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर काल रात्री उशीरा मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.कालच्या सर्व घडामोडी पाहता राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे बोलले जात होते.मात्र खुद्द शरद पवार यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावत राजकीय भूकंपाचे खंडन केले आहे.तीन नेत्यांच्या गुप्त बैठकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर पवार यांनी मातोश्रीवरील भेटीबाबत खुलासा केला आहे.

पवार,मुख्यमंत्री आणि राऊत यांच्या मातोश्रीवरील बैठकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार अशा चर्चा सुरू असतानाच या सर्व शक्यता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावल्या आहेत.कालच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत असतानाच शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र काम करत सरकार चांगले चालवत आहेत, असे  पवार यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे.या कोरोनाच्या रोगराईतून राज्याला कसे बाहेर काढाता येईल यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.यावर आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका एकच आहे.काल रात्री मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा आम्ही घेतला. राज्यातील रुग्णांची संख्या तसेच आरोग्य सुविधांबरोबरच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यावी, यावर या बैठकीत चर्चा झाली असे पवार यांनी स्पष्ट केले.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी  दोन वेळा चहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे काल राज्यपालांची भेट घेतली असा खुलासा त्यांनी केला.

Previous articleमातोश्रीवरील बैठकीत मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली !
Next articleअहमदाबादमध्ये  ४० लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण : काँग्रेसचा गौप्यस्फोट