मातोश्रीवरील बैठकीत मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली !

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल रात्री उशीरा मातोश्रीवर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.पवार यांच्या या भेटीनंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात असून,या भेटीमागे नेमके काय कारण असावे याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला  आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आल्याची टीका करीत भाजपच्या नेत्यांच्या राजभवनावरील वा-या मोठ्या प्रमाणात वाढल्या असतानाच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली.या भेटीनंतर भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने अनेक चर्चा सुरू होत्या.राज्यातील ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरले असल्याची टीका करीत त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.राज्यपालांच्या भेटी नंतर शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी पवार यांनी मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. ही भेट झाल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विटरवरुन दिली आहे.पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बैठकीवरुन गदारोळ होण्याचे काहीच कारण नाही. यात आश्चर्य वाटण्यासारखे काय कारण आहे ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. सध्याच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटात पवारांकडून मार्गदर्शन घेतले तर त्यामध्ये वाईट वाटण्याचे कारण नाही. पंतप्रधानही शरद पवारांचे मार्गदर्शन घेतात.त्यामुळे पवारांशी चर्चा केली म्हणून गदारोळ करण्याचे कारण नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले

पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेमुळे कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी असा टोला लगावतानाच राज्यातील सरकार मजबूत आहे त्यांची चिंता नसावी असेही राऊत यांनी म्हटले आहे.कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे.संशोधन जारी है, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.राज्य संकटात असताना सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.राज्यात अशी भूमिका विरोधकांनी घेणे राज्याच्या हिताचे आहे असेही राऊत म्हणाले. राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर त्याची सुरूवात गुजरातमधून झाली पाहिजे. गुजरातमधील उच्च न्यायालयाने कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासंबंधी निष्कर्ष काढला आहे तो गंभीर आहे.गुजरातच्या राज्यपालांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून समज दिली पाहिजे आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारला पाहिजे, असे राऊत यांनी सांगून,पुढील पाच वर्ष राज्यातील ठाकरे सरकारला कसलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले. धोका असेल तर विरोधी पक्षाला आहे.राज्याला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे असा टोलाही राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

राज्यातील भाजपची सत्ता गेल्याचे सल केंद्रातील नेत्यांना आहे.त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने भाजपचे नेते प्रचंड नाराज आहेत.त्यातच राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्यातील ठाकरे अपयशी ठरले असल्याची टीका करीत यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यात कोरोनाचे संकट वाढत असतानाच राज्यातील भाजप नेत्यांच्या राजभवनातील वा-या वाढल्याने राज्यातील राजकारणात काही उलथापालत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.त्यातच कोरोनाच्या संकटात केंद्र सरकार राज्याला पुरेशी मदत करीत नसल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारला फटकारले होते.मजूरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सोडण्यात येणा-या ट्रेनवरूनही राज्यातील राजकीय वातारवरण ढवळून निघाले आहे.त्यातच उत्तरप्रदेश सरकारवर खासदार संजय राऊत यांनी टीकेचा भडीमार केल्याने भाजप विरूद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचे चित्र आहे.राज्यातील सरकारवर निशाणा साधण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू असल्याचे समजताच या परिस्थितीचा कसा मुकाबला करायचा याबाबत काल रात्री मातोश्रीवर झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

Previous articleराज ठाकरेंनी राज्यपालांना पत्र लिहून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत केली मोठी मागणी
Next articleमातोश्रीवरील बैठकीत काय चर्चा झाली; शरद पवारांनी केला खुलासा