प्रवीण दरेकर आमदार निधीतून केइएम रुग्णालयाला ऑक्सिजन मशीन देणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केइएम रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली व  आढावा घेतला. के.इ.एम रुग्णालयात पुरेश्या आरोग्य यंत्रणा उपलब्ध असून सध्या रुग्णालयात हाय-फ्लो-नेझल कॅनूला या ऑक्सिजन मशीनचा तुटवडा असून आमदार निधीमधून काही मशीन उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.याप्रसंगी आमदार कालिदास कोळंबकर तसेच के.इ.एम रुग्णालयातील वैदयकीय अधिकारी वर्ग उपस्थित होते.

दरेकर यांनी सांगितले की, केइएम रुग्णालयालात आरोग्य व्यवस्था कशा प्रकारे कार्यान्वित आहे याची पाहणी करण्यात आली. कालच मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी आणि संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन मुंबई महानगरपालिका कोविड संदर्भात  कशाप्रकारे व्यवस्था करते याची माहिती घेतली. कोविड रोखण्यासाठी व तेथील रुग्णांवर उपचाराबाबत केइएम रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित आहे याबाबत आज प्रत्यक्ष आढावा घेतला. रुग्णालयातील वैदयकीय अधिका-यांना सूचना देण्याबरोबर त्यांना ज्या मशीन्सची गरज आहे त्या देखील पुरविणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका आणि राज्य शासनाचे पाठबळ आवश्यक आहे. हे पाठबळ देणे विरोधी पक्ष म्हणून आमचीही जबाबदारी असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

केइएम रुग्णालय हे सर्व सामान्यांचे रुग्णालय असून रुग्णालयावर सर्वसामान्यांचा विश्वास असल्यामुळे या ठिकाणी सशक्त आणि परिपूर्ण आरोग्य व्यवस्थांची गरज आहे. तरी ज्या सूचना सरकारला करायच्या आहेत व सरकारकडून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या सरकारला द्यायला भाग पाडू. या संदर्भात पालिका आयुक्तांशी बोलणार असून येथील व्यवस्था रुग्णांच्या सेवेसाठी अधिक सुलभ होईल यासाठी प्रयत्न व पाठपुरवा करण्यात येणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.केइएम रुग्णालयाच्या भेटीदरम्यान रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होणे, कोरोनाबाधित रुग्णांच्या निधनानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात देणे, तेथील आरोग्य यंत्रणा या सर्व विषयांवर रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ.हेमंत देशमुख यांच्याशी तपशीलवार चर्चा झाली, अशी माहितीही दरेकर यांनी दिली.

Previous articleम्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले सलमान खानचे आभार !
Next articleमुंबई,ठाणे,पुण्यातील लॉकडाऊन कायम राहणार ?