मुंबई,ठाणे,पुण्यातील लॉकडाऊन कायम राहणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला देशव्यापी चौथा लॉकडाऊन उद्या म्हणजेच ३१ मे रोजी संपत आहे असून,पाचव्या लॉकडाऊन संदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना आज जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कंटेन्मेट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रापुरता येत्या ३० जूनपर्यंत लॉकडाउन असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या आणि रूग्ण संख्या वाढत असलेल्या मुंबई,ठाणे पुण्यातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.आता राज्य सरकारकडून लॉकडाऊनबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील त्यामध्ये याबाबत अधिकची स्पष्टता करण्यात येईल.

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने आत्तापर्यंत चार वेळा लॉकडाऊन लागू केला आहे.देशव्यापी चौथ्या लॉकडाऊनची मुदत उद्या म्हणजेच ३१ मे रोजी संपत आहे.महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे,नाशिक,नागपूर शहरांमध्ये कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन संबंधी चर्चा केली,यावेळी शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेतली.या बैठकीनंतर शहा यांची पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक बैठक झाली या बैठकीत देशव्यापी पाचव्या लॉकडाऊनबाबत मार्गदर्शक सूचना आखून त्या आज जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार देशात कंटेन्मेट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रापुरता येत्या ३० जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई,चेन्नई,दिल्ली,अहमदाबाद,ठाणे,पुणे,हैदराबाद,कोलकाता,इंदौर,जयपुर,जोधपूर,चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर या तेरा शहरांमध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात येवून, ज्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार नाही अशी शहरे किंवा गावं मोकळा श्वास घेण्याची शक्यता आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेली १३ शहरे सोडून ज्या भागात कोरोनाचा प्रसार किंवा प्रादुर्भाव झाला नाही अशा  ठिकाणची हॉटेल्स, मॉल्स तसेच रेस्टॉरंट टप्प्या टप्प्याने  सुरू केली जाणार आहे.आता राज्य सरकार आपली मार्गदर्शक सूचना जाहीर करणार असून,कोणत्या शहरात ३० जूनपर्यंत लॉकडाउनची बंधने असतील तर कोणत्या बाबींंना सूट देण्यात येईल हे स्पष्ट होईल.

Previous articleप्रवीण दरेकर आमदार निधीतून केइएम रुग्णालयाला ऑक्सिजन मशीन देणार
Next articleअभिनेता सोनू सूदच्या कार्याचे राज्यपालांनी केले कौतुक