जितेंद्र आव्हाडांचा “तो” मास्क चर्चेत ! 

मुंबई नगरी टीम

मुंबई: राज्याचे  गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड नेहमीच चर्चेत असतात,त्यांनी नुकतीच कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर आपल्या कामाचा धडाका पुन्हा सुरू केला आहे.आज पुण्यातील एका बैठकीच्या निमित्ताने ते पुन्हा चर्चेत आले पण कोणत्याही वक्तव्यामुळे नव्हे तर त्यांनी तोंडावर लावलेल्या मास्कमुळे. त्यांनी खबरदारी म्हणून तोंडाला निळ्या रंगाचा मास्क लावला होता आणि त्यावर अॅटिट्यूड असे इंग्रजीतील शब्द असल्याने त्यांच्या या मास्कचीच चर्चा जास्त होती.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज पुण्यात झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली. पुणे तसेच पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समितीची स्थापना केली जाणार असून समितीच्या अभ्यासानंतर पुणे आणि पिंपरी -चिंचवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार असल्याचे  गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार सांगितले.पण आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी तोंडावर लावलेल्या मास्कची जास्त चर्चा होती.आव्हाड यांनी कोरोनावर मात केल्यानंतर प्रथमच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत तोंडावर नाविण्यपूर्ण मास्क लावले होते. निळ्या रंगाचा मास्क आणि त्यावर अॅटिट्यूड असे इंग्रजीतील शब्द यांमुळे बैठकीत आणि त्यानंतर पत्रकार परिषेदत त्यांची चर्चा होती.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात पुणे तसेच पिंपरी- चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत आढावा घेतला.पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात ज्या सनदी अधिका-यांनी यापूर्वी काम केले आहे, शहरांच्या विकासासाठी योगदान दिले आहे,अशा माजी सनदी अधिका-यांचा सहभाग घेत एक समिती स्थापन केली जाणार आहे, या समितीमध्ये शहराच्या विकासात योगदान देणारे इतर जाणकार प्रतिनिधीही असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून या समिती तसेच झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कार्याला अंतीम स्वरूप देण्यात येईल. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे नवीन पथदर्शी मॉडेल तयार करून गती देणार असल्याचे सांगतानाच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या वतीने झोपडपट्टीवासियांना पुढील काही महिन्यात ओळखपत्र देण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी मांडलेल्या मागण्यासंदर्भात गृहनिर्माण विभागाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचेही गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी सांगितले.

तसेच झोपडपट्टी विकासाच्या धोरणाची वाटचाल, योजना अंमलबजावणीची प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सद्य:स्थिती, तेथील अडचणी, शासनाचे अर्थसहाय्य, झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन, अंतर्भूत प्रकल्प, सध्याची स्थिती, अडकलेले प्रकल्प, प्रस्ताव आदी विषयांसह शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठेच्या अडचणी, त्या सोडवणुकीच्या दृष्टीने  आढावा घेण्यात आला.

Previous articleवाचा : जीएसटीने करदात्यांना उपलब्ध करून दिली महत्वपूर्ण सुविधा
Next articleबाळासाहेब थोरातांना ‘मातोश्री’च्‍या दारात जावे लागणे हीच मोठी शोकांतिका