सिल्वरओकवर शरद पवार आणि नाना पटोले यांच्यामध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यावर विजेचे संकट ओढवले असून केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक पुरेसा कोळसा पुरवठा केला जात नाही.केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर कारवाया केल्या जात आहेत.केंद्र सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे होत असलेला महाराष्ट्राची बदनामी या विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात चर्चा झाली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सिल्वरओक या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून राज्यावरील भारनियमनाचे संकट,केंद्रीय तपास यंत्रणांचा सुरू असलेला गैरवापर यावर चर्चा केली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की,राज्यात विजेची मागणी वाढलेली असताना केंद्र सरकारकडून राज्याला पुरेसा कोळशा पुरवठा केला जात नाही परिणामी राज्यावर लोडशेडींग करण्याची वेळ आली आहे. हा विषय तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या अडवणुकीमुळे राज्य अंधारात जाण्याचा धोका आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने राजकीय सूडबुद्धीतून कारवाई केली जात आहे. केंद्र सरकार दबाव बनवून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे पण केंद्र सरकारची ही मनमानी जास्त दिवस चालणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणामार्फत जेंव्हा मविआ नेत्यांवर कारवाई केली जाते तेव्हा कर नाही तर डर कशाला? असे म्हणणारे भाजपा नेते प्रविण दरेकर व इतर भाजपा नेत्यांवर राज्यातील यंत्रणा कारवाई करतात तेंव्हा आकांडतांडव का करतात ? असा सवाल पटोले यांनी विचारला आहे. आजच्या भेटीत केंद्र सरकारकडून राज्याला दिली जात असलेली सापत्नभावाची वागणूक व राज्याला भेडसावणाऱ्या महत्वाच्या विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. या सर्व विषयांवर दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करतील.

आयएनएस विक्रांत’बद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी सेव्ह विक्रांत अभियान राबवण्यात आले होते. यावेळी जमा केलेला पैसा कुठे गेला हा प्रश्न विचारला जात आहे, तो रास्तच आहे. तो पैसा राजभवनला पाठवल्याचे सांगितले जात होते पण राजभवननेच असा कोणताही निधी मिळाला नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा पैसा कुठे गेला याचे उत्तर भाजपाने जनतेला दिले पाहिजे परंतु भाजपा जाणीवपूर्वक विषयाला बगल देत आहे. विक्रांतसाठी जमा केलेला पैशाचा व्यवहार कोणत्या बँकेतून झाला हे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे, या सर्वांचा खुलासा करून त्या पैशाचे काय झाले समजले पाहिजे.

Previous articleसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन ‘मास्टरमाईंकडून’हिंदुत्वाचा आधार काढून घेण्याचे कारस्थान
Next articleवीज टंचाई असली तरी कोणत्याही परिस्थितीत राज्यात भारनियमन होऊ देणार नाही