मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या नेमणूकीचा तिढा कायम असून,येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनापूर्वी १२ नावांची शिफारस राज्यपालांना केली जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी,कॉंग्रेससह शिवसेना पक्षांमध्येही वाट्याला येणा-या जागांसाठी मोठी चुरस असल्याने इच्छूंकांनी मोर्चे बांधणीला जोरदार सुरूवात केली आहे.
विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या १२ राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या नेमणूका लांबणीवर पडल्या आहेत.राज्यपाल अशा सदस्यांची नेमणूका करताना निकषांचा काटेकोरपणे अवलंब करणार अशी शक्यता गृहीत धरून महाविकास आघाडीतील तिन्हीही पक्ष यासाठी सावध पावले टाकत असल्याचे सध्याचे चित्र आहे.राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होत असल्याने त्यापूर्वी १२ जणांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडे कार्यकर्ते उघडपणे उमेदवारीची मागणी करीत असले तरी शिवसेनेत तशी मागणी करताना कोणीच दिसत नाही.शिवसेनेच्या वाट्याला येणा-या जागांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेणार असले तरी शिवसेनेच्या गोटातून काही इच्छूंकांनी नावे समोर आली आहेत.शिवसेनेकडून राज्यपाल नामनियुक्त सदस्यांसाठी निकषात बसणा-या उमेदवारांची चाचपणी सुरू असली तरी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
मुंबई क्रिकेट संघटनेशी संबंधित असणारे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचेही नाव इच्छूंकामध्ये असून, क्रीडा क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांच्याही नावाची विचार होवू शकतो.होम मिनिस्टर या मालिकेमुळे घरांघरात पोहचलेले आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत असणारे शिवसेना सचिव आणि श्री.सिद्धीविनायक मंदीर न्यासाचे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असणारे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याही नावाची चर्चा आहे.दूरचित्रवाणी क्षेत्रातील एक अभिनेते,सूत्रसंचालक अशी त्यांची ओळख आहे.कला क्षेत्राशी असलेला त्यांचा संबंध पाहचा त्यांच्या नावावर राज्यपालांकडून मंजूरी मिळण्यास अडचण येणार नसल्याने बांदेकरांचे नाव आघाडीवर आहे.आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला साथ दिल्यानंतर शिवशक्ती भीमशक्तीवर ठाम राहिलेले दलित सहित्यिक,लेखक,कवी अर्जून डांगळे यांच्या नावाचीही चर्चा शिवसेनेत आहे.सहित्यिक,लेखक,कवी असलेले डांगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना कोणतीही अडचण येण्याची शक्यता नसल्याने शिवसेनेकडून डांगळे यांचेही नाव आघाडीवर आहे.इतिहास अभ्यासक,शिवव्याख्याते, लेखक आणि शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे यांच्याही नावाची चर्चा आहे.कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष असलेले प्रा. बानगुडे आपल्या शिवव्याख्यानामुळे प्रसिद्ध आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील त्याचे पक्ष बांधणीचे काम पाहता त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.या नावांसोबतच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीतून माघार घेतलेले माजी राज्यमंत्री सचिन अहिर,माजी आमदार सुनील शिंदे आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची नावेही चर्चेत आहेत.