पंतप्रधानांची घोषणा : ३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना  मोफत धान्य देणार

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू झालेल्या अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील जनतेला काय आवाहन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे.या योजनेचा लाभ देशातील ८० कोटी जनतेला होणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाईल अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशाला संबोधित केले. भारत चीन या दोन देशांत सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते कोणता संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे.या योजनेचा लाभ देशातील ८० कोटी जनतेला होणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकर लागू केली जाईल अशीही घोषणा त्यांनी केली.पुढील 5 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ आणि १ किलो हरभरा डाळ मोफत देणार अशी घोषणा त्यांनी केली आहे.कोरोनाविरोधात लढताना आपण अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत असताना सर्दी,खोकला,ताप या आजारांची लागण होणाऱ्या वातावरणातही आपण प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्व नागरिकांनी  काळजी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले.

जगभरातील देशांच्या तुलनेने भारताची स्थिती चांगली असून,योग्य वेळी करण्यात आलेला लॉकडाऊन आणि इतर निर्णयामुळे भारतात लाखो लोकांचे जीवन वाचले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मात्र जेव्हापासून देशात अनलॉकचा पहिला सुरु झाला आहे,तेव्हापासून व्यक्तीगत आणि सामाजिक व्यवहारात निष्काळजीपणा वाढत चालला असल्याचे त्यांनी सांगितले.मास्क वापरणे, सोशल डिस्टिन्सिंग ठेवणे आणि हात धुण्याबाबत आपण सतर्क होतो. मात्र संकटावेळी आपल्याला जास्त सतर्कताची गरज असताना निष्काळजीपणा वाढणे चिंताजनक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.राज्य सरकार,स्थानिक प्रशासन आणि देशाच्या नागरिकांना तशाचप्रकारे गांभीर्याने घेणे जरुरीचे आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये तर प्रचंड लक्ष द्यावे लागेल असे सांगतानाच,जे नियमांचे पालन करणार नाही, त्यांना समजावावे लागेल असेही पंतप्रधान म्हणाले.सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता गेल्याने एका देशाच्या पंतप्रधानांना १३ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला.भारतातही स्थानिक प्रशासनाला अशाच प्रकारे काम करावे लागेल. गावाचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान सर्वांना नियम सारखे आहेत. कुणीही नियमांपेक्षा मोठा नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous article“या” कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची राज्यशासनाची रेल्वेला विनंती
Next articleसीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी नवीन महाविद्यालय सुरू करणार