सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी नवीन महाविद्यालय सुरू करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन  मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विद्यापीठाचे उपकेंद्र,नवीन महाविद्यालय लवकर स्थापन  करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  दिली आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात या मराठी महाविद्यालयासाठी पाच एकर जमीन उपलब्ध झाल्यानंतर त्याचा बृहत आराखडा तयार करून या महाविद्यालयाला शासन स्तरावरील सर्व मान्यता देण्यात येतील. पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन २०२१ – २०२२ पासून प्रवेश देण्यात येतील. सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण या महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागात मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विद्यापीठाचे उपकेंद्र महाविद्यालय स्थापन करण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत  करण्यात आली आहे.यात उच्च शिक्षण संचालक,कोल्हापूर आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू, उपसचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,डॉ.दीपक पवार यांचा समावेश आहे.

Previous articleपंतप्रधानांची घोषणा : ३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना  मोफत धान्य देणार
Next articleग्रामीण भागातील ५ कोटी जनतेस मोफत अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषधे वाटणार