भाजपच्या १०५ जागांमध्ये शिवसेनेचे मोठे योगदान

मुंबई नगरी टीम

मुंबई : सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ज्या १०५ जागांवर विजय मिळवला त्यामध्ये शिवसेनेचे मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त करतानाच,विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपला साथ दिली नसती तर भाजपला केवळ ४० ते ५० जागाच जिंकता आल्या असत्या असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले.

राज्यातील तमाम जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारीत झाला.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक गोष्टींचा उलघडा केला.खा.संजय राऊत यांनी यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी बेधडक उत्तरे देत राजकारणातील पैलू समोर आणले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ज्या १०५ जागांवर विजय मिळवता आला त्यामध्ये शिवसेनेचे मोठे योगदान असल्याचे पवार यांनी सांगतानाच,शिवसेनेने भाजपाला साथ दिली नसती तर भाजपाला राज्यात केवळ ४० ते ५० जागा मिळवता आल्या असत्या असेही मत  पवार यांनी व्यक्त केले.भाजपाने मित्र शिवसेनेला गृहित धरण्याची जी भूमिका घेतली ती अयोग्य असल्याचे सांगितले.

संजय राऊत : लोकशाहीत १०५ जागा असणारा पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही ?

शरद पवार : मुळात भाजप प्रमुख पक्ष कसा झाला याच्या खोलात जायला हवं असं माझं मत आहे.भाजपला मिळालेल्या १०५ जागांमध्ये शिवसेनेचे मोठे योगदान आहे.शिवसेनेने भाजपशी युती केली नसती तर किंवा १०५ जागा त्यामधून वजा केल्या असत्या तर भाजपला केवळ ४० ते ५० च्या आसपास जागा मिळाल्या असत्या.१०५ वर पोहचवण्याचे काम ज्यांनी केलं त्यांनाच जर गृहित धरण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं नाही वेगळं काही करण्याची गरज होती.

संजय राऊत : लॉकडाउनवरून तुमच्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद होते ?

शरद पवार : लॉकडाउनमुळे घराच्या बाहेर पडता येत नसल्याने बरीचशी काम करता येत नाहीत. अनेक घडामोडी थांबल्या आहेत. आणि या घडामोडी थांबल्याचा परिणाम जसा वेगवेगळ्या घटकांवर झाला तसाच वृत्तपत्रांवर सुद्धा झाला. त्यांना जे वृत्त हवं असतं ते वृत्त देणारे कार्यक्रम कमी झाले. म्हणून मग जागाभरण्यासाठी अशा बातम्या दिल्या गेल्या. याच्यात आणि त्याच्यात नाराजी आहे.मी  काही दिवसांपासून वाचतोय की काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत. पण हे  सत्य नाही.

संजय राऊत : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा कशी होती ?

शरद पवार : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा, कामाची पद्धत ही भाजपच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही.मला जे बाळासाहेब ठाकरे माहीत आहेत, माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना कदाचित अधिक माहिती आहेत.बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची विचारधारा यात अंतर होते. बाळासाहेबांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन अशा काही व्यक्तींचा सन्मान केला. त्यांनी त्यांना सन्मानाची वागणूक देऊन  एकत्र येण्याचा विचार केला आणि पुढे सत्ता येण्यात हातभार लावला. काँग्रेसशी बाळासाहेबांचा संघर्ष होता, पण तो काही कायमचा संघर्ष होता असं मला वाटत नाही. शिवसेना ही काँग्रेसच्या कायमच विरोधात होती असं नाही. बाळासाहेब जितके रोखठोक तितकेच दिलदार होते.आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या विरोधात देश होता त्या वेळेला शिस्त आणण्याचा निर्णय करणारे नेतृत्व म्हणूनच ते इंदिरा गांधी यांच्यासोबत उभे होते. आम्हालाही धक्का बसावा अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

संजय राऊत : तुम्ही महाविकास आघाडी सरकारचे हेड मास्टर आहात की रिमोट कंट्रोल ?

शरद पवार : मी महाविकास आघाडी सरकारचा हेड मास्टरही नाही आणि रिमोट कंट्रोल देखील नाही. हेडमास्टर असला तर तो शाळेत असायला हवा.लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधीही चालत नाही. जिथं लोकशाही नाही तिथंच रिमोट चालतो. रशियाचं उदाहरण पाहिलं तर तेथे पुतीन २०३६ पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहणार आहेत. ही एकहाती सत्ताच आहे. लोकशाही वगैरे सर्वकाही बाजूलाच केले आहे. त्यामुळे आपण म्हणू तसे सरकार चालवले पाहिजे हा अट्टाहास आहे. इथं लोकशाही सरकार आहे आणि लोकशाहीचे सरकार कधीही रिमोट कंट्रोलवर चालू शकत नाही. सरकार मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळच चालवत आहे.

संजय राऊत : देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेबाबत केलेला दावा ?

शरद पवार : देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते.त्यांना काहीच माहिती नाही.सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही.

Previous articleसर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण कायम राहिल
Next articleश्री गणेशाची मूर्ती ४ फूटाचीच ; गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर