गणेशोत्सवामध्ये जिल्हाबंदीत सवलत मिळणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई  : कोकणातील चाकरमान्यांना  गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासंदर्भात देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा यासाठीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार असून,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हाबंदी असली तरी गणेशोत्सवात यामध्ये सवलत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट संकेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना द्यावयाच्या सोयी सुविधाबाबत आज कोकणातील लोकप्रतिनिधींची बैठक राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीत कोकणातील सर्व लोकप्रतिनिधीकडून विविध प्रकारच्या शिफारशींचे एक पत्र आणि त्यासाठीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील तो अंतिम असेल असेही या बैठकीत ठरले असल्याची माहिती मंत्री  परब यांनी दिली. कोरोनामुळे सध्या जिल्हाबंदी कायम असून त्यात सवलती देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असेही परब यांनी सांगितले.मुंबईच्या तुलनेत कोकणात क्वारंटाईनची व्यवस्था कमी आहे.त्यामुळे यंदा कमी प्रमाणात लोकांनी कोकणात जावे, असा विचार समोर आला. तसेच बसेस व्यवस्था कशी करायची याचे नियोजन मुख्यमंत्र्यांच्या निर्णय नंतर केले जाईल असेही परब यांनी सांगितले. राज्यात सध्या आंतर जिल्हा परवानगी बंद आहे, परवानगी मिळाली तर तशी व्यवस्था केली जाईल.याबाबतचे सगळे अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे आहेत. विलगिकरण करण्यासाठी किती दिवस असतील, हे अद्याप ठरलेले नाही असे परब म्हणाले.

गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल घरगुती गणपती कसा साजरा करायचा या संदर्भात सरकार लवकरच नियमावली जाहीर केली जाईल, अशीही माहिती ही परब यांनी यावेळी दिली.

Previous articleविधानपरिषदेतील १२ राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या लांबणीवर ?
Next articleराज्यात कोरोनाचे १ लाख  ७ हजार ६६५ ॲक्टीव्ह रूग्ण