लॉकडाऊन हटवा अन्यथा १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरू !

मुंबई नगरी टीम

पुणे :  राज्यातील कोरोना रुग्णांना चांगले औषध द्या,उरलेल्या ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहे.राज्यातील एसटी बस सेवा सुरु करा. टपरीवाले, फेरीवाले यांना स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या, महाराष्ट्राला आता निर्णयाची गरज आहे.सरकारने १० ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी कोणत्याही वेळेला रस्त्यावर उतरेल ,असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. पुणे येथील पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.

ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांच्यावर चांगले उपचार करा, त्यांना चांगले औषध द्या, मात्र ५ टक्के लोकांसाठी तुम्ही ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे येथील पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. राज्यात दहा हजार राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्यापेक्षा राज्य परिवहन सेवेला सुरुवात केली तर कर्मचारी कपात करण्याची वेळ येणार नाही. मुंबईत अर्ध्यापेक्षा जास्त बस सुविधा सुरू करायला पाहिजे त्या अद्यापही झालेल्या नाहीत. मुंबईसह इतर मनपा क्षेत्रातही बस सेवा सुरू करण्याची आता गरज आहे. त्याचबरोबर टपरीवाले, फेरीवाले यांना आता स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या. आज महाराष्ट्राला निर्णयाची गरज आहे. शासनाने दहा ऑगस्ट पर्यंत निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी केव्हाही आणि कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी व कोरोना नसतांना मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जाहीर करून हे दाखवून दिले की कोरोना नसताना अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. म्हणजेच कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी असल्याचे त्यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी दाखवून दिले.

Previous articleमोठा दिलासा : राज्यात एकाच दिवसात बरे झाले १० हजार ८५४ रुग्ण
Next articleखासगी रुग्णालयांच्या मनमानी शुल्क आकारणीला बसणार चाप