महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्धार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे.मात्र अजुनही लढाई संपली नाही.कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविले तर देश जिंकेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. आज प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल,पंजाब,आंध्रप्रदेश,कर्नाटक,तेलंगणा,तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार असल्याचे ते म्हणाले

इमिनॉलॉजी लॅबची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. विविध प्रकारच्या विषांणुचा उद्भव कसा आणि का होतो यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जे उद्या करायचे ते आज आणि आज करायचे ते आत्ता असे उद्याचे जग कोरोनाने आजच दाखवले.विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीवन धोक्यात घालता कामा नये त्यामुळे नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ नयेत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रधानमंत्र्यांकडे केली. विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन (ॲग्रीगेट)  उत्तीर्ण करण्यात यावे. कोरानामुळे किती काळ असे राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार, यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर  कोरोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध असल्याचे सांगतानाच यासुविधांसाठी डॉक्टर, नर्से, कर्मचारी यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.कोरोनावर अद्याप औषध नाही आणि लस अजून उपलब्ध झालेली नाही.  जनजागृती करतांना आज घडीला तरी मास्क, सोशल डिस्टंसिंग हेच औषध आणि लस आहे असे नागरिकांना समजून सांगतले आणि अशा पद्धतीने कोरोनासोबत आपण जगायला शिकलो तर लॉकडाऊन नाही तर अनलॉकिंगची प्रक्रिया आणखी  सोपी आणि जलद होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडले.

Previous articleदूध उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही
Next articleकॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश