प्रविण दरेकरांचा आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीवर आक्षेप

मुंबई नगरी टीम

मुंबई : पद्म पुरस्कार शिफारस समितीची घोषणा काल राज्य सरकारने केली असून,मंत्र्यांच्या या समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेतला आहे.

“पद्म पुरस्काराच्या समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची निवड करणे खूप घाईचे आहे. अननुभवी अशा तरुण मंत्राच्या अध्यक्षतेखाली एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठीच्या समिती तयार करणे संयुक्तिक आहे असे मला वाटत नाही.जरी ते राजशिष्टाचार मंत्री असले तरी एका प्रकरणामध्ये कोर्टामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. अशावेळी  या सन्मानाच्या पुरस्कारासाठीच्या समितीमध्ये; अध्यक्षपदी अनेक जेष्ठ, बुजुर्ग, अनुभवी, मंडळी असताना त्यांची नियुक्ती करणे योग्य आहे,” असे मला वाटत नाही, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीबद्दल आक्षेप नोंदविला आहे.

‘मुंबई पोलिसांवर तर पवार साहेबांप्रमाणे सर्वसामान्य जनतेचा,सर्व नेत्यांचा पूर्ण विश्वास आहे. पवार साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलेय, केंद्रात मंत्री म्हणून काम केलेय आणि प्रशासकीय यंत्रणांचे कामकाज त्यांना नीट माहिती आहे. त्यामुळे मुंबई पोलीस काय, बिहार पोलीस काय किंवा सीबीआय काय, अंतिमतः या तपास यंत्रणांच्या माध्यमातून सत्य जनतेसमोर येणे आवश्यक असते. खरा गुन्हेगार लपता काम नये, यासाठी या तपास यंत्रणा आहेत. आणि यासाठी त्यांची हरकत नसल्याचं त्यांचे वक्तव्य अगदी योग्य आहे, असे मला वाटते असे दरेकर म्हणाले.

तसेच पार्थ पवारांनी केलेल्या मागणीला कवडीचीही किंमत नाही. असे पार्थ पवारांच्याबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे. पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका अपरिपक्व नेत्याला उमेदवारी दिली का ? असा प्रश्न निर्माण होतो. पार्थ पवार युवा नेते आहेत. त्यांच्या भूमिकेत काही खाली-वर असू शकते. पण त्यांना काडीचीही किंमत नाही असे म्हंटल्याने या युवा नेतृत्वाचे मनोबल त्यामुळे खच्ची होईल, असे मला वाटते,’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते  दरेकर यांनी दिली आहे.

Previous articleजनता लवकरच तुम्हाला शॉक देईल… चंद्रकांत पाटलांची ऊर्जा मंत्र्यांवर टीका
Next articleमंत्र्यांकडून बदल्यांमध्ये प्रचंड कमाई ; सीआयडी चौकशी करा