मुंबई नगरी टीम
मुंबई : भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा केला जात आहे. परंतु यंदाच्या स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचे सावट असल्याकारणाने तो अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हा लढा कोविडपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा असल्याचे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी कोविड योध्दांचा सत्कार केला.
आदित्य ठाकरे यांनी वांद्रे येथील जिल्हाधिकरी कार्यालय येथे ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी कोविड योध्दांचा सत्कार देखील केला. “त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच मुंबईमध्ये कोविडवर आपण नियंत्रण प्राप्त करू शकलो आहे. हा लढा कोविडपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा आहे, मला खात्री आहे की ही लढाई सुध्दा आपण नक्कीच जिंकू”, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, यातून बरे होणा-यांचे प्रमाण देखील मोठे आहे. त्यामुळे राज्यासह देशही लवकरच या महामारीच्या संकटातून बाहेर येईल, असा विश्वास प्रत्येकानेच बाळगला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह वर्षा या शासकीय निवासस्थानी उपस्थिती लावत ध्वजारोहण केले. तसेच मंत्रालयाच्या प्रांगणात देखील मुख्यंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मुख्यंत्र्यांनी जय जवान जय किसान, जय कामगार असा नारा दिला. ध्वजारोहण कार्यक्रमावेळी डॉक्टर, नर्सेस, पोलीस कर्मचारी, स्वच्छता दूत आदींची विशेष उपस्थिती होती. हेच खरे कोविड योद्धे आहेत, अशा भावना देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाचे मुद्दे देखील मांडले.शेतक-यांना स्वतःच्या पायावर उभे करणार, गावोगावी आणि दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा देणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यासह, कामगारांचे हीत जोपासण्यास प्राधान्य देणार, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या परिस्थितीत कर्तव्यावर तत्पर असणा-या पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत आपल्याला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले.