आदित्य ठाकरे यांच्याशी रिया चक्रवर्तीचा काहीही संबध नाही,वकीलांकडून खुलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सुणावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून यात राज्याचे पर्यटन मंत्री  आदित्य ठाकरे यांचे देखील नाव घेण्यात आले होते. मात्र आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांचा काहीही संबध नाही, असा खुलासा रियाचे वकील सतीश मानशिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील अधिकृत स्टेटमेंट त्यांनी जाहीर केले आहे.

सुशांतच्या मृत्यूला एक महिना उलटून गेला आहे. मात्र अद्यापही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. या प्रकरणातील रोज नवी माहिती समोर येत असून तपास आणखी किचकट झाला आहे. अशातच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. तर या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले जात आहे. मात्र “रिया हीचा आदित्य ठाकरे यांच्याशी काहीही संबंध नाही. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आहेत इतकेच तिला ठाऊक आहे. तिने कधीच त्यांची भेट घेतली नसून फोन किंवा इतर माध्यमातूनही त्यांच्याशी संपर्क झाला नाही”, असे मानशिंदे यांनी म्हटले. तसेच अभिनेता डिनो मोरियाला रिया एक कलाकार म्हणून ओळखत असून एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात सुशांत प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान आदित्य ठाकरे यांचे नाव देखील आले असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. यावर आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. तर या आधी आदित्य ठाकरे यांनी एक पत्रक काढून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचे म्हणत विरोधकांना चांगलेच सुणावले होते.

Previous articleसंजय राऊतांच्या राजीनाम्यासाठी डॉक्टर संघटना आक्रमक ; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
Next articleकोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा