मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात आली आहे.मराठा आरक्षणविषयक कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करणाऱ्या या उपसमितीत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार सदस्य आहेत. हीच समिती आता मराठा समाजाच्या इतर मागण्यांचाही पाठपुरावा करेल.अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला एकप्रकारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. मागील काही दिवस आ. विनायक मेटे ही मागणी करीत होते.