मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात आल्याने मोठा वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणात विरोधक आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे बोट दाखवत त्यांच्यावर टीका करत आहेत. परंतु आता भाजप नेत्याकडूनच आपण आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले नसल्याचे सांगितले जात आहे. उलट शिवसेनेचे नेतेच हे सर्व जाणुनबुजुन करत असल्याच्या दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले.
आम्ही फक्त युवा नेता म्हणत असून आदित्य ठाकरेंचे नावच घेतले नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्याचे नाव घेतले नव्हते.भाजप नेत्यांनी देखील युवा मंत्री असे म्हटले आहे. मंत्रिमंडळात अनेक तरुण मंत्री आहेत. परंतु आदित्य यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असे वाटत असल्याचे आश्चर्य आहे, असे नितेश राणे म्हणाले. तसेच अदिती तटकरे, अस्लम शेख, अमित देशमुख आदींना या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावेसे का वाटले नाही ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचे नाव घ्यावेसे का वाटले या दृष्टीने देखील आम्ही सीबीआयला तपास करण्याची विनंती करणार आहोत, असे नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे यांनी आपल्या पक्षाची बाजू सावरत थेट आता शिवसेनेवर आरोप केले आहेत. “शिवसेना खासदार संजय राऊत स्वतःच आदित्य ठाकरेंचे नाव घेत असून आव्हान देत आहेत.परिवहनमंत्री अनिल परब यांनी ट्वीट करत १३ तारखेला पार्टी झाल्याचे सांगितले. त्यांना काय माहिती आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे. आम्ही सोडून सगळे आदित्य ठाकरेंचे नाव गोवण्यासाठी का आतुर झाले हे मलाच शिवसेनेला विचारायचे आहे. ते जाणुनबुजुन सर्व करत आहेत”, असा गंभीर आरोप यावेळी नितेश राणेंनी केला. इतकेच नाही तर शिवसेनेत जुने विरुद्ध नवा असा वाद रंगला असल्याचा दावा नितेश यांनी केला आहे. शिवसेनेत जुन्या नेत्यांना डावलले जात असून आदित्य यांचे नाव पुढे केले जात आहे. यातून विरोधकांना बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे, असे नितेश राणेंचे म्हणणे आहे.
दरम्यान, सुशांत सिंह प्रकरणात विरोधकांनी सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांविरोधात सूर आळवलेला पाहायला मिळाले. त्यात आदित्य ठाकरे यांचे नाव देखील जोडले जात असून या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले.त्यामुळे विरोधकांनी अप्रत्यक्ष का होईना पण आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. नितेश राणे यांच्या या गंभीर आरोपानंतर शिवसैनिक काय भूमिका घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.