मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणारे दोन दिवसाचे राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरक्षित सोशल डिस्टन्सिंगच्या निकषाचे पालन करून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.
येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणारे पावसाळी अधिवेशन हे केवळ दोन दिवसच चालणार आहे.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीची बैठकीत दोन दिवसाचे कामकाज ठरविण्यात आले.या बैठकील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,अध्यक्ष नाना पटोले उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाजमंत्री ॲड. अनिल परब आदी उपस्थित होते.या बैठकांमध्ये कोविड परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडांचे पालन करुन अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे ६ सप्टेंबर रोजी सर्व आमदारांची कोरोनासाठीची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे. ज्या आमदारांची कोविड चाचणी निगेटिव्ह असेल अशाच आमदारांना अधिवेशनासाठी उपस्थित राहता येईल.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक आमदाराला सुरक्षा किट देण्यात येणार आहे.या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल. या अधिवेशनात आमदारांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही.सहव्याधी असलेल्या (कोमॉर्बिडीटी) सदस्यांना काळजी घेण्याबाबतच्या सूचना संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून दिली जाणार आहे.दोन दिवसांच्या या अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा,अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा घेण्यात येईल. यामध्ये ७ शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल.