राज्यात पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती ; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई । गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.या निर्णयानंतर नागरीकांनी मास्कचा वापर करणे बंद केल्याने मुंबईसह राज्यात रूग्ण संख्या वाढल्याचे दिसते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.त्यानंतर माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती होऊ शकते,असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व मुख्यमंत्र्यांशी कोरोना विषयावर संवाद साधला.यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती त्यांना दिली.या बैठकीनंतर टोपे यांनी माध्यमांना माहिती दिली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार असून, राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय होवू शकतो असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे असल्याबाबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या काही दिवसात राज्यात विशेषत:मुंबईत रूग्ण संख्या वाढल्याचे दिसते.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंचसूत्रीची करणे गरजेचे आहे.पहिल्या सूत्रानुसार राज्यात दररोज २५ हजारांपर्यंत तपासण्या करण्यात येत असून,यामध्ये वाढ करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्यात सध्या ९२५ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.यापुर्वी राज्यात ६५ ते ७० हजार रूग्ण मिळत होते.त्यामुळे चिंता करण्यासारखी परिस्थीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यात लसीकरण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामध्ये ६ ते १२ वयोगटासाठी लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली असल्याने महाराष्ट्रासमोर पुन्हा एक मोठे काम असल्याचे सांगून त्या संदर्भातील विसृत नियमावली अद्याप पाठवलेली नाही.मात्र नियमावली येताच त्यांची अंमलबजावणी आरोग्य विभागाकडून केली जाईल.शाळा आणि पालकांना विश्वासात घेऊन लसीकरण वाढवावे लागणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Previous articleमहाविकास आघाडीत पुन्हा धूसफुस; निधी मिळत नसल्याची काँग्रेस आमदारांची तक्रार
Next articleमहाराष्ट्राला केंद्राकडून सापत्न वागणूक ; पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री संतापले !