प्रवीण दरेकरांनी केला मालाड मधील रुग्णालयाच्या राक्षसी लुटमारीचा पर्दाफाश

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात सामान्य नागरिकाला लाखो रुपयांचे बिल पाठविणा-या व जोपर्यंत बिल भरत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यत न देण्याचा मुजोरपणा करणा-या मालाड येथील लाइफलाइन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या राक्षसी लुटमारीचा आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पर्दाफाश केला. मृत रुग्णाच्या टाळूवरचे लोणी खाणा-या रुग्णालयावर तात्काळ गुन्हा दाखल करा तसेच रुग्णाच्या मृत्युप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाविरुध्द तात्काळ ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी दरेकर यांनी केली अन्यथा  सामान्यांची लुटमार करणा-या या रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दरेकर यांनी यावेळी केली.

मालाड पश्चिम येथील लाइफ लाइन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाने एसआरएमध्ये राहणाऱ्या एका सामान्य नागरिकाला तब्बल २१ लाखाचे बिल देण्यात आले. दुदैर्वाने तो रुग्ण वाचला नाही. शिवाय ८ लाख भरूनही त्या रुग्णाचा मृतदेह ताब्यात देण्यात येत नव्हता याची  माहिती मिळताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी तिथे आज सकाळी रुग्णालयात धाव घेतली आणि रुग्णालयातील लुटमारीचा पर्दाफाश केला. रुग्णालय सील करुन मुंबई महापालिका आणि पोलिसांनी तात्काळ रुग्णालयाच्या विरोधात कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी यासाठी आंदोलन छेडेल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

प्रसारमाध्यमाशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, केवळ लूटमार करण्यासाठीच अशी हॉस्पिटल काढली आहेत की काय ? असे विदारक चित्र लाईफ लाईन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. ‘हॉस्पिटलमध्ये बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस नंतर पुन्हा बायोपॅक चार्जेस म्हणजे एकाचवेळी दोन-दोन प्रकारचे चार्जेस त्या रुग्णाच्या बिलात लावण्यात आले आहेत. एका पीपीई किट साठी ३५०० रुपये लावले आहेत. ‘बायोमेडिकल वेस्ट चार्जेस २५०० रुपये प्रमाणे पुर्ण बिलात ७७ हजार ५०० रुपये बिलात लावले आहेत. अशा प्रकारे ही राक्षसी लूटमार चालविली आहे. मेडिसिनचे बिल तब्बल १० लाख ६२ हजार एवढे प्रचंड असल्याची वस्तुस्थिती त्यांनी निदर्शनास आणली.

दुदैर्वाने तो रुग्ण वाचला नाही. त्याचे निधन झाले. महापालिका, पोलीस, राज्य सरकारचे या लुटमारीच्या प्रकराविरुध् काही नियंत्रण आहे का ? कोविडच्या संकटकाळात सामान्यांची ही लूटमार कधी थांबणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.विरोधी पक्ष या नात्याने आम्ही लुटमारीचे प्रकार उघडकीस आणत आहोत, पण सरकार ढिम्म असल्याचा आरोप करताना दरेकर यांनी अनेक रुग्णालयात अशी लूटमार होत आहे. त्यामुळे पोलीस व महापालिकेने लूटमार करणाऱ्या अश्या रुग्णालयांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करुन लुटमार करणारी हॉस्पिटल सील करावीत अशी मागणीही केली.

 सरकारच्या परिपत्रकाला केराची टोपली

रुग्णालयांकडून सरकारच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखविली जात आहे. केवळ परिपत्रक काढून चालत नाही तर त्यावर नियंत्रण व त्याचे मॉनेटरिंग करणे आवश्यक आहे, मात्र येथे हा अभाव आहे. म्हणूनच ३०० रुपयांचे किटचे ३ हजार ५०० रुपयाचे बिल लावले जाते. सरकारच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये पेशंट जात नाहीत. तेथे हजार बेडची व्यवस्था आहेत तिथे केवळ ५० रुग्ण आहेत तर ९५० बेड रिकामे आहेत. पण रिकाम्या बेडचे भाडे ठेकेदारांना देण्यात येत आहे ही लुटमार आधी बंद केली पाहिजे, कारण येथे रुग्णाचे नाही तर ठेकेदारांचे हित जपले जात आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून त्याचा पर्दाफाश आम्ही या विधीमंडळाच्या अधिवेशनात करू, असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे.

Previous article३७६ पोलीस अधिकारी,२४७४ पोलीस कोरोनाबाधित ;१५६ पोलिसांचा मृत्यू
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर केव्हा पडणार ?