‘आम्ही दिलेला शब्द पाळला… ‘आरे’च्या निर्णयावर आव्हाडांची प्रतिक्रिया

मुंबई नगरी टीम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ‘आरे’ची ६०० एकर जागा वनांसाठी राखीव ठेवली जाणार आहे. या जागी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे येथे मेट्रो ३ साठी कारशेड बांधले जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आरेचे जंगल वाचवण्यासाठी येथे आपल्यासह अनेकांनी केलेल्या आंदोलनाची आठवून करून देत आम्ही दिलेला शब्द पाळला, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

“मित्रहो, आम्ही दिलेला शब्द पाळला…आरेचे जगंल वाचावे यासाठी माझ्या सहित अनेकांनी आंदोलने केली. तुरुंगात गेले पण, तत्कालीन सरकार बधले नाही. परंतु,आपले सरकार आपल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला. अभिनंदन आपणा सर्वांचे, संघर्षाचा विजय असो”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यासह आव्हाडांनी या आंदोलनावेळी आपण तुरुंगात गेले होतो याची आठवणही करून दिली आहे. आरेमध्ये जंगलतोड करून तिथे मेट्रो ३ चे कारशेड  बांधण्याच्या मुद्द्यावरुन गेल्यावर्षी मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. यामध्ये विविध सामाजिक संघटनांसह पर्यावरणप्रेमींनी तत्कालीन सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला होता. तर जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी देखील आरेच्या वृक्षतोडीला विरोध केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या  बैठकीत या संबंधित निर्णय घेण्यात आला. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशारितीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे हे जगातील पहिलेच उदाहरण ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा पर्यावरणप्रेमींनी मोठा आनंद झाला आहे. तर मेट्रो कारशेड आरेच्या जमिनीवर होणार नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आधीच एका बैठकीत स्पष्ट केले होते.

Previous articleसरकारचा मोठा निर्णय : आता ‘या’ २० खेळातील गुणवंत खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी
Next articleसुप्रिया सुळेंनी राज्यातील रेस्टॉरंटस् खुली करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी