पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील पोलीस आणि पोलिस अधिका-यांच्या बदल्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ  देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय गृहविभागाने जारी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात केल्या जाणाऱ्या बदल्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.या अगोदर अशा बदल्या करण्यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती.आता ती वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने पोलीस खात्यात मोठे फेरबदल करीत तब्बल ४० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच पोलीस खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.तर याआधीच सरकारने बदल्यांसाठी ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.त्यानुसार गणेशोत्सवानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र सरकारने आता बदली प्रक्रियेला आणखी मुदतवाढ देत ती ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.सरकारकडून केल्या जाणाऱ्या बदल्यांबाबत विरोधी पक्ष भाजपने आक्षेप घेत अनेक आरोप केले आहेत.सरकार बदल्यांचा धंदा करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आला होता.तर नव्या सरकारने बदल्या करू नये, असे कुठे लिहले आहे का ?, असा उलट प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या बदली प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असून ठाकरे सरकारातील नेतेही त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.

Previous articleआता ७/१२ वर असणार प्रत्येक गावाचा युनिक कोड,वॉटर मार्क आणि शासनाचा लोगो
Next articleकंगनाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही – गृहमंत्र्यांचे मोठे विधान