मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्याची लागण राजकीय नेत्यांना देखील होत आहे. ऐन अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्र्यांसह एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचाही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी निघालेले महेंद्र दळवी यांना अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरावे लागले आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आज ट्विटरवरून दिली आहे. “सतत फिल्डवर आहे. लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला, तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या,” असे ट्वीट प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी आमदार महेंद्र दळवी हे मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र प्रवासादरम्यानच त्यांना आपला कोरोना चाचणीचा अहवाल मॅसेजद्वारे आला. आपला कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच महेंद्र दळवी हे माघारी परतले. तर पुढील १० दिवस ते होम क्वारंटाईन असणार आहेत.