माझ्याकडील व्हिडीओ क्लिप्स आणि कागदपत्रे बाहेर आली तर हादरा बसेल : खडसेंचा गौप्यस्फोट

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. नुकत्याच एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी पुन्हा खळबळजनक खुलासा केला आहे.माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स आणि कागदपत्रे आहेत.ती समोर आली तर अनेकांना हादरा बसेल. मात्र इतक्या खालच्या पातळीचे राजकारण मी करत नाही, असे खडसे म्हणाले. यावेळी एकनाथ खडसे यांनी पक्षांतर्गत त्यांची होणारी घुसमट व्यक्त करताना अनेक मोठे खुलासे केले.

माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडिओ क्लिप्स आणि कागदपत्रे आहेत. ती समोर आली तर अनेकांना हादरा बसेल. मात्र इतक्या खालच्या पातळीचे राजकारण मी करत नाही. मी वरिष्ठांना ते दाखवले आहे. पक्षाच्या वरिष्ठांसमोर त्या बाबी मी मांडल्या आहेत.वरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेकडे मांडेन. ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्या जीवनात यामुळे बदल घडू शकतो,असा इशाराही खडसेंनी यावेळी दिला.एकनाथ खडसे यांनी दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी आपल्या राजीनाम्याविषयी देखील भाष्य केले. ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत एकाही विरोधकाने भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही.आमच्या काळात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले पण त्यांना राजीनामा देण्यास सांगितले नाही.तर माझा राजीनामाही मी स्वतः दिलेला नाही.वरिष्ठांकडून आदेश आहेत असे सांगितल्यावर मी कोऱ्या कागदावर सही केली. मी स्वःतून राजीनामा दिला नव्हता, असा खुलासा देखील खडसेंनी केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत एकनाथ खडसे हे आपल्यावर झालेल्या आरोपांचे वारंवार खंडन करत स्पष्टीकरण देत आहेत. यावेळी ते उघडपणे देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत त्यांच्यावर आरोप देखील करत आहेत. तर आता ते आपल्या प्रत्येक मुलाखतीत जाहीरपणे तत्कालीन सर्व वस्तुस्थिती हळूहळू समोर आणत आहेत. त्यामुळे वेळीच पक्षश्रेष्ठींनी याकडे लक्ष घातले नाही तर भाजपच्या अनेक नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Previous articleराज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ? शिक्षणमंत्र्यांनी केला मोठा खुलासा
Next articleशिवसेनेचे महाराष्ट्रात गुंडाराज…सरकारची भूमिका संशयास्पद