राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ? शिक्षणमंत्र्यांनी केला मोठा खुलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा  सुरू करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्रात अद्याप शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. संस्थाचालकांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला असून दिवाळीनंतरच याबाबात निर्णय होईल, अशी शक्यता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे.त्यामुळे कोरोनाच्या भितीने धास्तावलेल्या पालकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

केंद्राच्या सुचनेनुसार २१ सप्टेंबरपर्यंत राज्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाची संस्थाचालक महामंडळासोबत शुक्रवारी ऑनलाईन बैठक पार पडली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा व शिक्षण विभागातील इतर अधिका-यांचा यावेळी बैठकीत सहभाग होता. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या घडीला शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका यावेळी संस्थाचालकांनी घेतली. शिवाय कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही पसरला आहे. त्यामुळे अशा  परिस्थितीत आपल्या पाल्याला शाळेत कसे पाठवावे, अशी भिती पालकांच्या मनात आहे.त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठवण्यास पालकांचीही सहमती नाही.

तसेच शाळा सुरू झाल्या तर सॅनिटायझर व इतर स्वच्छतेच्या साहित्य खरेदीसाठी अनुदानाची देखील गरज भासेल. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता दिवाळीपर्यंत तरी शाळा उघडण्याची चिन्हे धुसर आहेत. तर प्रत्यक्ष शाळा सुरू होणार नसल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नववी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याची सशर्त परवानगी दिली. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडून लेखी स्वरूपात परवानगी घ्यावी लागणार आहे. मास्कची सक्ती, वारंवार हात धुवणे, अशी खबरदारी घेतच शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Previous articleखुशखबर : राज्यातील हॉटेल,लॉज,रिसॉर्टस् सुरू करण्यास परवानगी
Next articleमाझ्याकडील व्हिडीओ क्लिप्स आणि कागदपत्रे बाहेर आली तर हादरा बसेल : खडसेंचा गौप्यस्फोट